Sunday, June 26, 2011

त्रिवेणी


rrp

पौर्णिमेचा ठसठशीत चंद्र उदास करतो मला..
लयदार चतकोर चंद्रकोर भुलवी-झुलवी मना
(-गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा!!!)


rrp

अंधुकले होते अन् हवा होती कुंद-कुंद
पाऊस संततधार.. खिडकीपाशी मी स्तब्ध
(तुझ्या आठवणींनी ऊब दिली, ..पण गारठलोही)


rrp

सगळे मामले मनाचे जरी केले साफ मी
होई ह्या काळजाची घालमेल कधीकधी
पाषाण-हृदयी बनणे इतके कठीण का?


rrp

सांग, कोणासही का तू भावला नाही?
-हृदय जिंकणे कठीण मामला नाही
(--पण, हा तुझा ही तर मामला नाही!)


rrp

बेबंद.. बेलगाम.. स्वतंत्र.. मस्तवाल..
-कितीदा वाटते जगावे उधाणून!
(एक वळू आहे माझ्या मनात दडून!!)


rrp

आरसाच सांगू शकेल खरे काय ते-
चेहरा काय होता? कसा झालाय आता?
(पण कोणता बदल कोणामुळे?, हे कोण सांगेल?)


rrp

धका-धकी ऐवजी तबीयतीने जगायची स्वप्ने!
पण मिळे द्रुत लय, विलंबित खयाल विसरा!!
(जणू सखीने कापावेत तिचे लांब सडक केस!!!)


rrp

बनून चांदणी विरघळ माझ्यात,
थंडक पसरू दे उसळत्या रक्तात!
(-नको थोपवूस अद्वैताच्या प्रवासात)


rrp

मी
तू
आपण!


rrp

हिंदुस्तान
पाकिस्तान
बांग्लादेश!


rrp

किंचाळून केला त्यांनी आक्रस्ताळी आक्रोश
त्यांना म्हणे ब्र ही उच्चारता आला नाही
आशय काहीच मांडला नाही त्यांनी परंतु!


rrp

-  संदीप  मसहूर

No comments:

Post a Comment